पुणे : आम्ही पदावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संबंधात असणारी सगळी प्रकरणे अनेकवेळा विनंती अर्ज करून सर्वोच्च न्यायालयातून मुंबई हायकोर्टात आणली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात याविषयी दोन मिनिटं देखील आढावा घेतला नाही. महाराजांची कीर्ती जगामध्ये पसरलेली यांना नको आहे का? जसं आग्र्याला शिवाजी महाराजांना बंदी वासात टाकण्यात आलं होत, त्याप्रमाणे ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? असा प्रश्न आता निर्माण होत असल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुणे येथे पार पडली, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी हालचाल करायला महाविकास आघाडी सरकार तयार नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय देयचा नाही. सरकार चालवणारे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात, मात्र मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. केवळ दिवस काढायचे आणि आश्वासन देयचं काम सरकारने केलं असल्याचं विनायक मेटे यावेळी म्हणाले.
बीड जिल्ह्यामधून जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत शासकीय आकडेवारीनुसार 160 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर शासन दरबारी नोंद नसलेल्या आत्महत्या पाहिल्यास 225 च्या वर आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचं दाखवणाऱ्या नेत्यांसाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकार शेतकऱ्यांच्याबद्दल मुर्दाड मनाचं झालं आहे. जनाची नाही किमान मनाची तरी यांना लाज वाटायला हवी. संपूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, हे सर्वांनी पहायला हवं असंही मेटे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील मंत्री सांगतात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. केवळ चेष्टा करायचं काम सरकार करत आहे. यांना शाहरुख खानचा मुलगा कसा जेलमधून सुटेल, नवाब मालिकांचा जावई कसा सुटेल यामध्ये रस आहे. तुम्हाला काय करायचं ते करा पण आधी शेतकऱ्यांना मदत करा. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत न पोहचल्यास दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या सरकार विरोधात बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s