शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेले आमचे उमेदवार परत करावेत; नाना पटोले यांची विनंती 

ठाकरे गट-राष्ट्रवादीने कॉंग्रेस पोखरली ?

सोलापूर – एका बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचा पराभव करू पाहणाऱ्या कॉंग्रेसला राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने मिळून पोखरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेले आमचे उमेदवार परत करावेत अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

महाडमधील स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचे अनेक नेत्यांना पक्षात घेणे सुरु केले आहे. आघाडीसाठी हे योग्य नसल्याची भूमिका मांडत नाना पटोले यांनी आमचे घेतलेले उमेदवार या पक्षांनी परत करावेत अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीत करणार असल्याचे सांगितले.
आज राष्ट्रवादीचे नाराज भगीरथ भालके यांची नाना पटोले यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाली. याबाबत छेडले असता भालके यांच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ दिले जाणार नसून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.