नात्यांमधील भावविश्वाचा ठेवा जतन करणारा अल्बम – ‘अमेरिकन अल्बम’

American Album: निसर्गातील विविध घटक स्वतःचं अस्तित्व असो की मूळ असो.. कधीच सोडत नाहीत. कारण जे मूळ असते तेथून अस्तित्वाची सुरवात असते. माणसाच्या अस्तित्वाचा हळुवार उलगडणारा ठेवा म्हणजेच अमेरिकन अल्बम नाटक. गेल्या तीन चार दशकांपासून भारतातून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं मुली शिक्षणाकरता अमेरिकेत जातात, तिथे शिक्षण घेऊन नोकरी मिळवतात, संसार थाटतात आणि अमेरिकेतच स्थायिक होतात. वरवर पाहता सगळं सुंदर ,छान असतं.. भरपूर पगाराची नोकरी, बंगला, गाडी, खिशात डॉलर्स, सुबत्ता, मौज- मजा आणि दिमतीला सर्व काही…

हे सर्व अमेरिकेत राहत असले तरी त्यांची पाळमूळं मात्र भारतीय असतात. एवढ्या ऐशोआरामात असूनही त्यांना सतत भारताची आठवण येत असते .. आपले नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आपले सण, आपल्या परंपरा, संस्कार..हे सगळं आठवत राहतं. भारतात येण्याची ओढ असते. पण अमेरिकेतच जन्मलेली त्यांची मुलं मात्र संपूर्ण अमेरिकन असतात. भारताबद्दल आत्मीयता नसते, आपली संस्कृती, आपल्या परंपरा याच्याविषयी वरवरची माहिती असते पण आदर नसतो. भारतातील आपल्या नातेवाईकांबद्दल ही मुलं फक्त ऐकून असतात. त्यांच्याशी फार संपर्क नसतो आणि त्यामुळे ओढही नसते. प्रश्न एवढ्यावरच संपत नाहीत. अमेरिकेतही सगळं आलबेल असतं ? तर याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल ! अनेकदा वेगवेगळ्या विचित्र घटना तिथेही घडत असतातच !

गेली अनेक वर्ष अमेरिकेत शिकागो येथे स्थायिक असलेलं कानेटकर कुटुंब हे याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल! हरिहर आणि नीलिमा कानेटकर हे अत्यंत उच्चशिक्षित, भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन शिकागो येथे स्वतःचा व्यवसाय उभा करून तिथल्या समाजात स्वतःचं मानाचं स्थान मिळवलेलं दाम्पत्य ! त्या दोघांच्या एकुलत्या एक मुलीचे.. हनीचे अमेरिकन मित्र-मैत्रिणी..ती हाणामारी, गुंडगिरी, ड्रग्ज यांच्या आहारी गेलेली. तिला भारताबद्दल प्रचंड तिटकारा! वाईट मार्गाला लागल्यामुळे ती वाया गेली असं वाटत असतानाच एका विचित्र प्रसंगामुळे नाईलाजाने तिला भारतात यावं लागतं. भारतात आल्यावर ती सुधारते ? भारता विषयीचा तिचा दृष्टिकोन बदलतो ? ‘आपल्या’ माणसांची ओळख तिला पटते ?

या सर्व प्रश्नांची उत्तरं अमेरिकेतील मराठी मनाचा आरसा दाखवणाऱ्या ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकातून आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर देश प्रेम जागृत करणारा सुंदर संदेशही हे नाटक आपल्याला देतं.

रसिकमोहिनी आणि एफ् एफ् टी जी निर्मित ‘अमेरिकन अल्बम’चे लेखन राजन मोहाडिकर यांनी केलं असून पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, आणि वेशभूषा केली आहे. दीपक करंजी कर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, अमृता पटवर्धन आणि भाग्यश्री देसाई या अनुभवी कलाकारांनी समरसून आपापल्या भूमिका साकार केल्या आहेत. अमेरिकेतील अत्यंत उच्च प्रतीचं सुशोभित घर दाखवणारं नेपथ्य, नेत्र सुखद रंगसंगती आणि प्रकाश योजना, सुमधुर पार्श्व संगीत यामुळे प्रेक्षक नाटक पाहताना भारावून जातात. या नाटकात दृकश्राव्य माध्यमाचा अतिशय खुबीने वापर केला आहे. यात सुहासिनी देशपांडे सारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसह चंद्रशेखर भागवत, नितीन पारेगावकर, प्रिया नेर्लेकर यांनी मोलाची साथ दिली आहे.

‘रसिकमोहिनी’ च्या भाग्यश्री देसाई या ‘अमेरिकन अल्बम’ नाटकाच्या निर्मात्या असून ‘एफ् एफ् टी जी’ चे झरीर इराणी आणि मोहनदास प्रभू हे सहनिर्माते आहेत. नात्यांची घट्ट गुंफण विणणारं, आणि अतिशय उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असलेलं हे महत्त्वाचं नाटक प्रेक्षकांना एक सुखद अनुभूती आणि सकारात्मक ऊर्जा देतं हे नक्की !

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल