आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणं गरजेचं आहे, शेलारांचा ठाकरेंना टोला

2000 Currency Notes: सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना आरबीआयने सांगितले की, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांची नोट चलनात बंद होऊ शकते परंतु 2000 रुपयांची नोट कायदेशीररित्या वैध राहील. आरबीआयने म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तसेच, बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलल्या जाऊ शकतात.

दरम्यान, या मुद्द्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती आता या टीकेला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी पलटवार केला आहे ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. मोदीजींचा देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा भरोसा आहे. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याच काही कारण नाही.

व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिला. २ हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचे ‘क्लीन नोट पॉलिसी’ हे धोरण आहे, हे धोरण चर्चेअंती झाले आहे. ते विविध बैठकांमध्ये सादर झाले. ज्यावर तज्ञांनी आपली मते मांडली आहेत, त्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.

तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजाराची नोट बाजारात आली त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था आहे असे आरबीआय आणि मोदीजींनी घोषित केले होते. ६ लाख ३२ कोटींच्या नोटा बाजारात होत्या त्यापैकी ३ लाख कोटींच्या जर चलनात असतील; जर व्यवस्थेत असतील तर उरलेल्या ३ लाख ४० हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात हे शोधणे प्रामाणिकपणाचं काम आहे, हे जनतेला हवे आहे… चोर पकडले गेले पाहिजेत. जे सुटले आहेत त्यांना धरले पाहिजे आता हे राज ठाकरे यांना सांगा असेही ते म्हणाले. मोदीजी जे करतात ते प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला जगण्याचं प्रामाणिकतेने स्थान मिळालं पाहिजे म्हणून करतात. टीका करणाऱ्यांच स्वागत तर आहेच पण कधी कधी असं वाटतं आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणं गरजेचं आहे, असेही आ. अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले.