शिवसेना अल्पसंख्याक समाजाच्या भक्कमपणे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेचा मुस्लिम अल्पसंख्याक भव्य मेळावा संपन्न

मुंबई – महायुतीचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे शिवसेना आणि मुस्लिम समाजात भिंत उभी करण्याचे काम केले आहे.पण आपल्याला ही भिंत आपल्याला तोडायची आहे. अठरागड जाती-जमाती, सर्व धर्माच्या विकासाचे आमचे लक्ष्य असून शिवसेना अल्पसंख्याक समाजाच्या भक्कमपणे पाठीशी उभी आहे आणि राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई येथील षण्मुख्यानंद सभागृहात आयोजित शिवसेना अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, आनंदराव अडसूळ, खासदार राहुल शेवाळे, डॉ.श्रीकांत शिंदे, भावनाताई गवळी, आमदार यामिनीताई जाधव, मनिषा कायंदे, शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख सईद खान (State Health Minister Dr. Tanaji Sawant, Anandrao Adsul, MP Rahul Shewale, Dr. Shrikant Shinde, Bhavnatai Gawli, MLA Yaminitai Jadhav, Manisha Kayande, Head of Shiv Sena Minority Division Saeed Khan) यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनेत काम करणारे पुढे जातात. कुणाचेही जात-धर्म पाहून पद दिले जात नाही. सर्व धर्माचा आदर करा अशी शिकवण बाळासाहेबांनी दिली, या शिकवणीनुसार आमची वाटचाल सुरु आहे. आमचे शासनाने जनहिताचे निर्णय घेतले आहे हे निर्णय घेतांना धर्माच्या आधारावर कुठलाही भेदभाव केलेला नाही. राज्यात मुस्लिम महिलांचे 2800 बचत गटांची निर्मिती करत आहोत. यामुळे या महिलांना स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. मुस्लिम समाजातील तरुणांतील कौशल्य विकासासाठी शासन प्रउयत्न करत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून १ हजारापेक्षा जास्त मुस्लिम बांधवांना वैद्यकीय मदत दिली आहे. महाड येथील इमारत दुर्घटनेतील पीडित मुस्लिम बालकांच्या नावावर 10 लाखाच्या ठेवी ठेवल्या असून त्या बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था आम्ही केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, भारत महान देश आहे, तुम्हाला आम्हाला देशावर गर्व आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. इतर देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या असतांना आपली अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे,ती प्रधानमंत्री मोदीजींच्या धोरणांमुळे उभी आहे. अशा आपल्या देशाचा गर्व बाळगणारा मुस्लिम बांधव हा खरा देशभक्त आहे. हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती, आणि त्याच विचारातून आम्ही काम करत आहोत. आपल्या शासनाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपासून आम्ही व्यापक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्पांना वेग दिला आहे. याआधी महायुतीचे सरकार असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आपला महाराष्ट्र परदेशी गुंतवणूक मिळवण्यात पहिल्या क्रमांकावर होता. सरकार बदलल्यानंतर इतर राज्य आपल्या पुढे निघून गेली. परंतू आपले सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी एक कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरु आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे मेहनत आणि संघर्ष करुन आम्ही राज्याला देशात प्रथम क्रमांकावर नेणार आहोत. यात आम्हाला केंद्र सरकारचा पाठिंबा मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांच्या विविध मागण्यांबाबत बोलतांना लवकरच बैठक लावून जे विषय तातडीने सुटण्यासारखे असतील त्यावर लगेच निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी मुस्लिम समाजातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवर व्यक्तिंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विदर्भ,मराठवाड्यासह राज्यभरातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.