Shivsena : चंद्रकांत खैरेंचे निकटवर्तीय नरेंद्र त्रिवेदींचा शिंदे गटात प्रवेश 

औरंगाबाद –  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नरेंद्र त्रिवेदी (Narendra Trivedi) यांनी नुकताच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे. मागील 20 वर्षांपासून नरेंद्र त्रिवेदी हे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

मागील आठवड्यातच त्रिवेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा मात्र ही भेट काही वैयक्तिक कामांकरिता असल्याचे सांगण्यात आले. अखेर शुक्रवारी या चर्चांना पूर्णविराम मिळाला.  त्रिवेदी यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संभापती यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला. या प्रसंगी शिवसेना आमदार संजय शिरसाट, संदिपान भूमरे, अर्जुन खोत आदींची उपस्थिती होती.

शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची अंबादास दानवेंवर नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रमुख पद असूनही ते पूर्ण क्षमतेने मिळाले नाही. पक्षात सगळंच आमदार अंबादास दानवे यांनाच दिले जात आहे. अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, असा सवाल करत त्रिवेदी यांनी शिवसेना सोडल्याचे वृत्त माध्यमांतून देण्यात आले आहे.