सोलापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदाही गड्डयाची यात्रा भरवण्यावर निर्बंध 

सोलापूर – सोलापूरात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदाही गड्डयाची यात्रा भरवण्यावर निर्बंध असणार आहेत. मात्र पारंपारिक रितीरिवाजानुसार धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

यामध्ये नंदीध्वज मिरवणूक, अक्षता सोहळा आणि इतर विधीवत कार्यक्रमांना काही अटी आणि नियमांच्या अधीन राहुन परवानगी देण्यात येईल असे संकेत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिध्देश्वर यात्रेसंदर्भात विविध विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात आली.

होम मैदानावर यंदा ही यात्रा भरवली जाणार नाही. त्यामुळे पाळणे, खेळणी आणि विविध प्रकारची दुकाने थाटण्यास यंदाही निर्बंधच राहणार आहेत. यात्रेदरम्यान दर्शनासाठीही परवानगी असणार आहे.मात्र गर्दी होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. आकाशवाणीने याबाबत वृत्त दिले आहे.