ओमिक्रॉनची संपूर्ण जगाने घेतली धास्ती; ‘या’ देशांनी कठोर पावलं उचलायला सुरूवात केली

न्युयोर्क – ओमिक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराची संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे. त्यामुळे जवळपास सगळ्याच देशांनी या विषाणूशी लढण्याच्या दृष्टीने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.सिंगापूर सरकारने आजपासून 20 जानेवारीपर्यंत बस आणि विमानांची तिकीटविक्री गोठवली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काल मोफत कोरोना चाचण्यांची घोषणा केली. त्याचबरोबर लस न घेणं हे जीवावर बेतू शकतं अशा शब्दांत लस न घेतलेल्या नागरिकांना सुनावलं.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी काल लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यास तसंच बंद पडलेली लसीकरण केंद्रं पुन्हा सुरू करण्यात येत आहे. दक्षिण कोरियामध्ये लॉकडाउनला होत असलेला विरोध लक्षात घेऊन गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असून रेस्तराँ, उपाहारगृहं आणि तत्सम आस्थापनांच्या वेळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्याचा विचार करून इस्राइलमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची चौथी मात्रा देण्याचा निर्णय काल घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांना चौथी मात्रा देण्यात येणार आहे. नागरिकांना तिसरी मात्रा देणारा इस्राइल पहिलाच देश होता, आता चौथी मात्रा देण्यातही इस्राइल पहिला क्रमांक पटकावत असल्याची भावना पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशात लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यात वर्धित मात्रा घेणाऱ्यांनाच पूर्णतः लसीकृत मानले जाते. ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे इस्राइलने अमेरिका आणि कॅनडासह इतर 10 देशांमधून इस्राइलमध्ये येण्यास बंदी घातली आहे.