स्पोर्ट्स फॉर ऑलची खेलो इंडियाशी भागीदारी; भारताचे भावी क्रीडापटू घडविण्यासाठी मुख्य प्रायोजक म्हणून भूमिका

भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञानाआधारित क्रीडा स्पर्धा संयोजक संस्था स्पोर्ट्स फॉर इंडिया यांनी भारतातील पायाभूत क्रीडा संस्कृतीला पुनरूज्जीवित करण्यासाठी खेलो इंडियाशी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला असून आगामी पाच वर्षांसाठी ते मुख्य प्रायोजक म्हणून भूमिका बजावणार आहेत. देशातील युवा क्रीडा पटू घडविण्यासाठी आणि अधिकाधिक ऑलिम्पिक पदके जिंकण्यासाठी डावपेचात्मक भागीदारी केल्याचे एसएफए यांनी जाहीर केले असून त्यानुसार येत्या वर्षात १२.५ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (Sports for All’s partnership with Khelo India; Role of New Delhi as the main sponsor to develop future sportspersons of India) .

यावेळी स्पोर्ट्स फॉर इंडियाचे संस्थापक ऋषिकेश जोशी म्हणाले की, क्रीडा पटूंना पायाभूत स्तरापासून पाठिंबा मिळाल्यास गुणवत्तेचे रूपांतर सर्वोत्तम कामगिरीत करता येते, असा विश्वास असल्याने आम्ही २०१५ मध्ये एसएफए अजिक्यपद स्पर्धेची सुरुवात केली. आमच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित धोरणाच्या आधारावर पायाभूत स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा इतकी वर्षे आयोजित केल्यानंतर आलेल्या अनुभवामुळे खेलो इंडियाला प्रायोजकत्व देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. या निणर्यामुळे पायाभूत पातळीपासून क्रीडा पटूंना पाठिंबा देऊन खेलो इंडिया मोहिमेला सर्वोतोपरी साहाय्य करण्याचा आणि देशाचे क्रीडा क्षितिज विस्तारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मोहिमेत क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वाना एका विश्वासू, पारदर्शक आणि पायाभूत स्तरापासून सलग काम करणाऱ्या ध्येयासाठी एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भारतातील पायाभूत स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सर्व क्रीडा प्रकारांना एकत्र आणण्यासाठी खेलो इंडिया या व्यासपीठाच्या माध्यमातून एक भक्कम व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनविण्यासाठी आखण्यात आलेल्या या कार्यक्रमाची बारा प्रकारात विभागणी करण्यात आली असून राज्य स्तरीय खेलो इंडिया केंद्रे, गुणवत्ता शोध व विकास, महिलांसाठी क्रीडा स्पर्धा, दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धा व गुणवत्ता विकास अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले की, एसएफए संस्थेला खेलो इंडियाचे प्रायोजक म्हणून स्वीकारताना भारतीय क्रीडा प्राधिकरणाला आनंद होत आहे. स्पोर्ट्स फॉर ऑल या संस्थेचा दृष्टिकोन पायाभूत पातळीवर गुणवत्तेचा शोध आणि विकास या शासनाच्या धोरणाशी मिळताजुळता आहे. तसेच देशातील युवा खेळाडूंसाठी सर्वोत्तम व्यासपीठ असलेल्या खेलो इंडिया उपक्रम त्यासाठी योग्यच आहे.

स्पोर्ट्स फॉर ऑल हा अत्याधुनिक डिजिटल व मैदानावरही कार्यरत असलेला उपक्रम टोकियो ऑलिम्पिक २०२०, राष्ट्रकुल स्पर्धा २०२२, आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा भागीदार भारतात अगदी तळागाळापासून गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन विविध खेळांच्या स्पर्धांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आयोजन करताना त्यामाध्यमातून या खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य त्यांच्याद्वारे केले जाते. स्पोर्ट्स फॉर ऑल संस्थेद्वारे आयोजित एसएफए अजिंक्यपद स्पर्धांच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात २० राज्ये आणि १५ लाख मुलांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

स्पोर्ट्स फॉर ऑल संस्थेने यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ या स्पर्धांचे संपूर्ण आयोजन करून आपला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखविले आहे. तसेच, पायाभूत स्तरावर १२ स्पोर्ट्स फॉर ऑल स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी क्रीडा क्षेत्राचा पायाभूत स्तरावर विकास व अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असणारी क्रीडा संस्कृती याबरोबर गुणवत्तेचे रूपांतर अत्याधुनिक सुविधांच्या साहाय्याने भावी काळातील उच्च दर्जाच्या खेळाडूंमध्ये करण्यासाठी आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचे पाचवे सत्र मध्यप्रदेश ३१ ते जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे