…म्हणून किरण मानेंची मालिकेतून हकालपट्टी केली, स्टार प्रवाहने दिलं स्पष्टीकरण

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( Mulgi Zali Ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

दरम्यान, आता भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे.  किरण माने यांना मालिकेतून काढल्याप्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण देत किरण यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकेच नाही तर स्टार प्रवाह वाहिनीने म्हटले आहे की, महिला कलाकारासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी किरण माने यांनी मालिकेतून काढण्यात आले आहे.

किरण माने यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत.स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, ”किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला. त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या.

माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.”स्टार प्रवाहने पुढे म्हटले आहे की, ”आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.