MI vs KKR: मुंबई-कोलकाता सामन्यात रोहितवर असणार सर्वांची नजर, जाणून घ्या कारण 

मुंबई- इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये (IPL 2023) आज (16 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडेवर होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माचा (Rohit Sharma) संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संघही विजयच्या वाटेवर परतण्याचा प्रयत्न करणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये असे  काही खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये रंजक लढत पाहायला मिळणार आहे.

सुनील नरेनने (Snuil Narine) IPL 2023 मध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये किमान एक षटक टाकले आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही तो हे करताना दिसणार आहे. रोहित शर्माला कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज सुनील नरेनचे कडवे आव्हान असेल. त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमध्ये सर्वाधिक 7 वेळा बाद केले आहे. सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये रंजक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात कोण कोणावर मात करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रोहितने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही तो आपला हाच फॉर्म कायम ठेवू इच्छितो. या सामन्यात 44 धावा करताच हिटमॅन विशेष क्लबमध्ये सामील होईल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 5966 धावा केल्या आहेत. 6,000 चा आकडा गाठण्यासाठी त्याला 44 धावांची गरज आहे. जर त्याने या धावा केल्या तर आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण करणारा तो चौथा फलंदाज ठरेल. रोहित शर्मापूर्वी, विराट कोहलीने इंडियन  प्रीमियर लीगमध्ये 6838, शिखर धवन 6477, डेव्हिड वॉर्नर 6109 आणि रोहित शर्माने 5966 धावा केल्या आहेत.