छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला; कर्नाटक सरकारच्या कारवाई वादात

मुंबई – कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा मध्यरात्री हटवला असून आता याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. या मुद्द्यावरून भाजपने कॉंग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारची मुजोरी सहन करणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.

बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीनं स्थापित करा अशी मागणी करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.

महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.