UPSCच्या परीक्षेत पोरगी देशात पहिली आल्याने आई झाली भावूक; जाणून घ्या UPSC टॅापर इशिताची यशोगाथा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) चा निकाल जाहीर झाला आहे. इशिता किशोर (Ishita Kishore) या परीक्षेत अव्वल ठरली आहे. इशिता किशोरने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. इशिता ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश (यूपी) येथील रहिवासी आहे. मधुबनी चित्रकलेची आवड  असणाऱ्या इशिताने  दिल्ली विद्यापीठातून (DU) पदवी पूर्ण केली आहे.

इशिता किशोरने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. इशिताचा ग्रॅज्युएशनमध्ये पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा पर्यायी विषय होता. यानंतर त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीत तिने काम केले. पण, भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न तिला नागरी सेवा परीक्षेकडे घेऊन आले आणि तिने यूपीएससीची तयारी सुरू केली होती.

इशिता किशोरचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. इशिता आज निकालाची वाट पाहत होती, पण ती ऑल इंडिया टॉपर होईल याची तिला कल्पना नव्हती. निकाल लागताच तिचे नाव सर्वत्र झळकले. ही गोष्ट तिने आईला सांगितल्यावर तीही आनंदाने नाचू लागली. इशिताने सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देश सेवेसाठी तत्पर पाहिले आहे. म्हणूनच माझ्या वडिलांना पाहून मला लहानपणीच विचार आला होता की, मी मोठी झाल्यावर देशहितासाठी अशी नोकरी करेन, जेणेकरून मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.