‘तू आघाडीचा प्रस्ताव दे, मी ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदूत्त्वाच्या गप्पा मारतो’

मुंबई – राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रस्तावावर विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आघाडीसाठी अनुकुलता दर्शविली आहे.

दरम्यान, या ऑफरमुळे शिवसेनेवर टीका होऊ लागली असून भाजपच्या नेत्यांनी सेनेला चांगलेच खिंडीत पकडल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला आता शिवसेनेकडून देखील भाजपकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी भाजप आणि MIMला फटकारले आहे. दानवेंनी ही ऑफर म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन असल्याचा आरोप केला आहे.

आंबादास दानवे यांनी एक फेसबूक पोस्ट केली असून या फेसबूक पोस्टमध्ये फडणवीस आणि जलील यांचा एक फोटो असून यात ते एकमेकांशी बोलत आहेत. या फोटोच्या सोबत दानवे यांनी  दोघांमध्ये काय संवाद होतोय हे सांगितले. यात जलील म्हणतात  मी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो.” त्यावर फडणवीस म्हणत आहेत की, “मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो.” अशी विनोदी पोस्ट दानवे यांनी पोस्ट केली आहे.