माळीणची पुनरावृत्ती : इर्शाळवाडी गावावर दरड नव्हे दु:खाचा डोंगर कोसळला,संपूर्ण देश हादरला

रायगड – रायगड जिल्ह्यात खालापूर इथं इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जणांना आपत्ती निवारण दलाच्या दोन पथकांनी आतापर्यंत वाचवलं आहे. आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफची आणखी दोन पथकं मुंबईवरुन रवाना झाली आहेत. चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर मोरबे धरणाच्या वरच्या डोंगर भागात ही आदिवासी वाडी आहे.

सध्या इर्शाळवाडी गावात NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण झालं आहे. 25 ते 30 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, यातील काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, तर काहींचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान,  ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, रत्नागिरी, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. कोकण भागात गेल्या दोन दिवसांत झालेला मुसळधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेला नारंगी बावट्याचा इशारा यामुळे हा निर्णय घेण्यात आला.