‘काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे…’; सुप्रिया सुळे यांनी शेअर केला शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आता त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्याने नवा पेटला आहे.  चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट केली आहे. खासदार शरद पवार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत  त्या म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.

शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले.