‘राष्ट्रवादीचा साधा ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपयांचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो’

सोलापूर – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा काही मुद्द्यांवरुन मतांतर असल्याचं पहायला मिळतं. सध्या निधी वाटपावरुन महाविकास आघाडीमधील या पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र असून त्याबद्दल जाहीर भाष्य केलं जात आहे. यातच आता शिवसेनेमुळे सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसैनिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पामध्येही हेच दिसून आलं आहे. ६०-६५ टक्के बजेट राष्ट्रवादीला, ३० ते ३५ काँग्रेसला, उरलेल्या १६ टक्क्यातहीही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ १० टक्के मिळतात. राष्ट्रवादीचा साधा ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपयांचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो अन् आमची केवळ गोड बोलून बोळवण केली जाते. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु. गेल्या अडीच वर्षात झाला तसा केवळ अपमानचं होणार असेल तर उद्धव साहेब आपण वेगळा विचार करायला हवा, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.