वेदनादायी मुद्द्यावरूनही  राजकारण सुरु; बुलढाणा दुर्घटनेवरुन ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका 

Uddhav Thackeray :  समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक काल रात्री झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर (Prime Minister Narendra Modi on Twitter)  संदेशातून या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी रुग्णांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे.

दरम्यान, या अतिशय वेदनादायी मुद्द्याचे देखील राजकारण विरोधकांनी सुरु केले आहे. याबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारनं अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

दुसऱ्या बाजूला समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला असून खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत व्यक्त केले आहे.