‘नाव दावोसला जाण्याचं, मात्र जनतेच्या पैशावर सैर करण्याचे हे उद्योग’

मुंबई – मविआचे (MVA) मंत्री दावोसला केवळ भारतीय कंपन्यांशी करार करण्याकरिता गेले होते का? अथवा दाओस दौर्‍यामध्ये अन्य किती कंपन्यांशी करार केला याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी तसेच केवळ दोन भारतीय कंपन्यांशी करार केले असल्यास या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा या सर्व मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray), त्याचबरोबर ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) व उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) हे सर्वजण दाओसला जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर करार करून परत आले. यावेळी त्यांनी एक कंपनी गुरगावातील Renewable Energy ज्याच्याबरोबर हजारो कोटींचे करार केले तर दुसरी शैक्षणिक कंपनी, Byju ज्याच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकरिता MOU केला गेला.

जर परदेशात जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर MOU करायचे होते तर त्याच्याकरिता जनतेच्या पैशाचा चुराडा करून दावोसला जाण्याची आवश्यकता काय होती? असा सवाल आ. भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नाव दावोसला जाण्याचं, मात्र जनतेच्या पैशावर सैर करण्याचे हे उद्योग असल्याची टीका आ. भातखळकर यांनी केली. त्यामुळे दावोसला जाऊन अन्य किती कंपन्यांशी करार केले याची माहिती जनतेला द्यावी आणि या दोन कंपन्यांशी करार केले असतील तर दावोसच्या दौऱ्यावर जनतेच्या पैशातून जो खर्च झालेला आहे तो सर्व खर्च जनतेला परत देण्यात यावा आणि हे पैसे तिन्ही मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.