कन्नडिगांची मुजोरी; महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींना काळे फासले

बेळगाव – सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी आज पुन्हा दिसून आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करत काळी शाई फेकण्यात आली. एका महामेळाव्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला केला.

या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला आहे. यावेळी कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

 नेमकं काय आहे प्रकरण ?

कर्नाटक विधानसभेचे आज बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते.

पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली.