संतापजनक : कोरियन You Tuber महिलेच्या छेडछाडीचा मुंबईतील लाईव्ह व्हिडीओ व्हायरल 

मुंबई : मुंबईच्या खार परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. दक्षिण कोरियातून मुंबईत आलेल्या युट्युबर महिलेची एका तरुणाने छेड काढली. छेडछाडीचा हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.  ही तरुणी व्हिडीओ शूट करत असताना स्थानिक तरुणांनी तिची छेड काढली.

संबंधित तरुणी ही दक्षिण कोरियाची (South Korea) नागरिक आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खार पोलिसांनी या प्रकरणी सुमोटा गुन्हा दाखल करुन घेत आरोपी तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. मोबीन चांद मोहम्मद शेख (वय 19 वर्षे) आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी (वय 20 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

दोन दिवसांपूर्वी ही तरुणी खार रेल्वे स्थानकाजवळील रोड नंबर पाचवर लाईव्हस्ट्रीमिंग करत होती. यावेळी तिथे दोन तरुणांनी तिचा हात पडकून खेचण्याचा, जबरदस्ती करण्याचा आणि चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान,सोशल मीडियात या घटनेच्या लाईव्ह व्हिडीओवरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.