भाजपमध्ये असतील ते क्लीन आणि विरोधातील डर्टी, ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळे संतापल्या

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.

यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दिल्लीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पंतप्रधानांना या सर्व प्रकाराबद्दल मी अत्यंत विनम्रपणे याविषयीचा प्रश्न विचारणार आहे, असं सुळे यांनी सांगितलं. भाजपाच्या विरोधातील लोकांवर आरोप केले जातात. हेच लोक भाजपात आले की त्यांच्यावरील आरोप विरघळतात, हे असं का होतं ? त्यांच्यावरील कारवाया कशा थांबतात, तर, भाजपमध्ये असल्यावर क्लीन आणि विरोधात असेल तर डर्टी असं का होत ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला

दरम्यान, श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.