मराठी सत्तेच्या विस्तारातील ‘या’ सरदारांचे योगदान कधीही विसरता येणार नाही

पुणे –  देशभरात मुघली सत्तेचा  डंका वाजत असताना छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून स्वाभिमानाने जनतेला जगण्याचा मूलमंत्र दिला. याच स्वराज्याचा भारतात विस्तार करण्याच्या कामी अनेक मराठी सरदारांनी (Marathi Sardars) मोलाची कामगिरी बजावली. त्यांपैकी काही प्रमुख सरदारांच्या कामगिरीचा आढावा आपण या लेखात थोडक्यात घेणार आहोत. खरतर  या सरदारांच्या कामगिरी बाबत पाठ्यपुस्तकात देखील माहिती देण्यात आली आहे.  मात्र आणखी माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

इंदौरचे होळकर : मल्हारराव हे इंदौरच्या होळकरांच्या सत्तेचे  संस्थापक. मल्हाररावाने दीर्घ काळ मराठी राज्याची सेवा केली. गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीत ते  निष्णात होते. थोरला बाजीराव व नानासाहेब पेशवा (Bajirao and Nanasaheb Peshwa) यांच्या काळात त्यांनी  उत्तरेत पराक्रम गाजवला. माळव्यात आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली.

पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. मल्हाररावांच्या निधनानंतर पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या  हाती इंदौरच्या कारभाराची सूत्रे आल्यानंतर त्यांनी  सुमारे अठ्ठावीस वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावली. त्यांनी राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले.

नागपूरचे भोसले – परसोजी भोसले (Parsoji Bhosale) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते . शाहूमहाराजांच्या काळात त्यांना  वऱ्हाड व गोडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली. नागपूरकर भोसल्यांपैकी रघूजी (raghuji Bhosale) हे  सर्वांत कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते . रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या स्वराज्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.त्यांनी  दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व अर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठी सत्तेच्या वर्चस्वाखाली आणला. बंगाल, बिहार व ओडिशा प्रांतांच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी रघूजीला दिले होते. त्यांनी  ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले.

ग्वालियरचे शिंदे : थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदे (Ranoji Shinde) यांचे कर्तृत्व हेरून त्यांना उत्तरेत सरदार म्हणून नेमले. राणोजीच्या मृत्यूनंतर जयप्पा, दत्ताजी व महादजी (Jayappa, Dattaji and Mahadji) या त्याच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठी सत्ता प्रबळ केली.माधवराव पेशव्याने शिंदे घराण्याची सरदारकी महादजीस दिली. ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी  केली.

पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजी यांनी भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली. त्यांनी फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली व तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले. इंग्रजांनाही धाकात ठेवले.

दिल्लीच्या बादशाहाने त्याला ‘नायब वकील-इ-मुत्लक’ (बादशाहाचा प्रमुख प्रतिनिधी) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. बादशाहाने त्यांच्या हाती आपला प्रतिनिधी म्हणून कारभार सोपवला. कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सावरणे सोपे काम नव्हते. महादजी यांनीअत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इ. स. १७८४ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार पाहिला. दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून महादजी पुण्यात आले. महादजी यांचा पुण्याजवळ वानवडी येथे मृत्यू झाला.

शिंदे, होळकर व भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठी राज्याची उल्लेखनीय सेवा केली. शिवाजीमहाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी व तुळाजी आंग्रे (Kanhoji and Tulaji Angre) या पितापुत्रांनी प्रबळ बनवले. या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी या आरमारी सत्तांना धाकात ठेवले. मराठी राज्याच्या किनारपट्टीचे रक्षण केले.

खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव (Khanderao Dabhade and his son Trimbakrao) यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाईने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले. तेथील किल्ला जिंकून घेतला. पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले. मध्यप्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठी सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे साहाय्य केले.

माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर मराठी राज्याची घडी विस्कटली होती. ती पेशव्यांचा प्रसिद्ध कारभारी नाना फडणवीस (Nana Fadnavis) या मुत्सद्द्याने महादजीच्या मदतीने व्यवस्थित बसवली. महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेला असताना नानाने दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली. या कार्यात पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्याला साथ दिली. त्यामुळे मराठी सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले.