काका -पुतण्यांच्या संघर्षाचा इतिहास नवा नाही; यापूर्वी हे नेते मंडळी आले होते आमने-सामने

राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान, अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे भारतीय राजकारणातील काही उच्च प्रोफाइल आणि यशस्वी काका-पुतण्याच्या जोड्यांमध्ये सामील होते पण आता ही जोडी पूर्णपणे विखुरली आहे. भारतीय राजकारणात काका-पुतण्याची लढाई नवीन नाही.देशाच्या राजकारणात आलेले अनेक काका-पुतणे वेळोवेळी एकमेकांशी भांडले आणि वेगळे होऊन दुसऱ्या पक्षात गेले. कधी काकांची तक्रार असे की पुतणे या पदासाठी योग्य नाहीत तर कधी पुतण्याने काकांबद्दल तक्रार केली.

भारताच्या इतिहासात काका-पुतण्याचे भांडण महाभारताच्या काळापासून सुरू आहे. धृतराष्ट्राने आपल्या मुलाच्या प्रेमात दुर्योधनाला पाठिंबा मात्र खरा सत्तेचा हक्कदार युधिष्ठिर होता. मुघल काळातही अलाउद्दीन खिलजीने आपला काका जलालुद्दीन खिलजी याला मारून सत्ता काबीज केली होती.

आज आपण भारतीय राजकारणातील काही काका संघर्षाच्या प्रकरणांवर प्रकाश टाकणार आहोत. राजकारणातील काका-पुतण्याच्या लढतीत शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यातील लढतीची जोरदार चर्चा रंगली होती. एकीकडे अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी पक्षाचा पाया घातला, तर दुसरीकडे काका शिवपाल यांनी पक्षाला वाढवले. मात्र पुतणे अखिलेश यांनी पक्षात पाऊल ठेवल्याने सारे चित्र पालटले.

समाजवादी पक्षाने २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आणि त्याऐवजी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. मुलायम सिंह यांचा उत्तराधिकारी म्हणून स्वत:कडे पाहणारे काका शिवपाल यांना धक्काच बसला. दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. पुढे काका-पुतण्यातील हे युद्ध अधिक तीव्र झाले. परिस्थिती आणखी बिघडली आणि 2018 मध्ये शिवपाल यांनी बंड केले. शिवपाल यांनी प्रगतीशील समाजवादी पार्टी नावाचा वेगळा पक्ष काढला. सपापासून वेगळे झालेले शिवपाल राजकारणात विशेष ओळख निर्माण करू शकले नाहीत आणि अखेर ते सपामध्ये परतले. इथे पुतण्याने काकांवर मात केली.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वाधिक गाजलेला संघर्ष म्हणजे काका बाळा ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे यांच्यात झालेला संघर्ष. काका बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कमान पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आणि राज ठाकरे यांना डावलले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला. राज ठाकरे हे त्यांच्या काकांच्या कार्बन कॉपीसारखे होते, राजकीय वर्तुळात ते बाळ ठाकरेंचे नैसर्गिक उत्तराधिकारी म्हणूनही पाहिले जात होते. पण खुर्चीवरून झालेल्या कौटुंबिक भांडणात सर्व काही उद्ध्वस्त केले.

याशिवाय स्व. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष देखील राज्याने पाहिला आहे. ज्या काकांचे बोट धारून धनंजय मुंडे राजकारणात आले होते त्यांनाच पुढे काकांशी संघर्ष करावा लागला. पुढे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. काही वर्षानंतर गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले.राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाजप सरकार असताना मंत्रिपद भूषवले. 2019 च्या निवडणुकीत पंकजांचा पराभव करीत धनंजय मुंडेंनी विधानसभा गाठली.

बीडमध्ये क्षीरसागर काका आणि पुतण्याचा संघर्षहि बराच चर्चेत आहे. काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील अजूनही संघर्ष सुरु आहे. 2019 च्या निवडणुकीत काका आणि पुतण्यात थेट लढत पाहायला मिळाली. पुतण्या संदीप यांनी राष्ट्रवादीकडून तर, काका जयदत्त यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला.

पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल आणि मनप्रीत बादल म्हणजेच काका-पुतण्याची जोडी एकेकाळी खूप गाजली होती.1995 मध्ये मनप्रीत पहिल्यांदा आमदार झाले. 2007 मध्ये प्रकाश सिंह पंजाबच्या बादल सरकारमध्ये अर्थमंत्रीही झाले, पण हळूहळू बादल कुटुंबातही भांडणे सुरू झाली. पक्षांतर्गत प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल यांना अधिक पसंती देण्यात आली आणि मनप्रीत यांना दूर ठेवण्यात आले. यानंतर मनप्रीतनेही काही मुद्द्यांवर पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम असा झाला की 2010 मध्ये त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचे आरोप झाले आणि ते पक्षापासून वेगळे झाले.

मनप्रीत सिंग बादल यांनी 2011 मध्ये पीपल्स पार्टी ऑफ पंजाब नावाचा नवा पक्ष स्थापन केला. 2012 च्या पंजाब निवडणुकीत दोन जागा लढवल्या, पण दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2016 मध्ये मनप्रीतच्या पक्षाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जानेवारी 2023 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. मनप्रीत बादल सध्या भाजपमध्ये आहेत.

पशुपती नाथ पारस-चिराग पासवान हे बिहारमधील काका-पुतण्यांमधील हायप्रोफाइल लढतीचे उदाहरण आहे. रामविलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले. यानंतर त्यांचा पक्ष एलजेपी फुटला. येथेही पक्षाचा वारसदार होण्याची राजकीय लढाई सुरू झाली. परिणामी पक्षाचे दोन तुकडे झाले. लोक जनशक्ती पक्षाचे नेतृत्व चिराग पासवान यांच्याकडे होते आणि राष्ट्रीय एलजेपीचे नेतृत्व पशुपतीनाथ पारस यांच्याकडे होते.

२०२० च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी चिराग पासवान स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणत होते, पण भाजपने चिरागला झटका दिला आणि काका पशुपती पारस यांना मोदी सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2021 मध्ये हरियाणात इंडियन नॅशनल लोकदलाचे नेतृत्व करणाऱ्या चौटाला कुटुंबाचा लढा रस्त्यावर आला होता. काका अभय चौटाला यांनी इंडियन नॅशनल लोकदलावर आपला हक्क सांगितला आणि पुतण्यांनीही बंड केले. दुष्यंत चौटाला आणि दिग्विजय चौटाला या दोन्ही पुतण्यांनी ‘जननायक जनता पार्टी’ हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. इकडे पुतण्याने काकांवर मात केली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पक्ष किंग मेकर म्हणून उदयास आला. दुष्यंत चौटाला आज हरियाणाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याचवेळी काका अभय चौटाला यांच्याकडे आज विधानसभेचे सदस्यत्वही नाही.