हॉटेल मालकाने बिल मागितले, सदाभाऊ म्हणतात हे तर राष्ट्रवादीतील एका नेत्याचं हे षडयंत्र 

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीमुळे (Legislative Council elections) चर्चेत असणारे शेतकरी नेते सदाभाऊ खोत  हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचा ताफा सोलापुरातील (Solapur) एका हॉटेल मालकाने अडवल्याची घटना घडली. गेल्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्यावे यासाठी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला असल्याची माहिती आहे. ताफा अडवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे, 2014 सालच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये (2014 Madha Lok Sabha Election) राहिलेले 66 हजार 450 रुपयांचे बिल सदाभाऊ खोत यांनी दिले नसल्याचा आरोप सांगोला (Sangola) तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे (Ashok Shingare) यांनी केला. त्या बिलाची मागणी करण्यासाठी आज त्यांनी चक्क सदाभाऊ खोत यांचा गाडीचा ताफाच अडवला.

अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले.  दरम्यान, आता सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर (NCP Leader) निशाणा साधला आहे.

बिलाप्रकरणी (Hotel Bill) आरोप करणार्‍या हॉटेल मालकामागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात असून टोमॅटोसारखे (Tomato)  गाल असलेल्या राष्ट्रवादीतील एका नेत्याचं हे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊंनी केला आहे. हॉटेल माकल अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या आरोपांना मी घाबरत नाही. राष्ट्रवादीच्या या राजकीय खेळीमुळे माझा आवाज दाबता येणार नाही, असंही सदाभाऊ ठणकावून सांगितलं आहे.