अतिवृष्टी, पुरामुळे अडकलेल्या २८० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतरण; ५३१७ नागरिकांची निवारागृहात व्यवस्था

यवतमाळ : परवापासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या एकूण २८० नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. तर ५३१७ नागरिकांना तात्पुरत्या निवारागृहात हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर बचाव कार्य सुरु होते.

जिल्ह्यात २०० मीमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळपासूनच तालुका व जिल्हा बचाव पथके नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करित होते. महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या ११० नागरिकांना हेलिकॅाप्टर व एसडीआरएफच्या मदतीने आनंदवाडी येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याच तालुक्यातील दहिसावळी येथील ८ व धनोडा येथील ५५ नागरिकांना जिल्हा शोध व बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले.

आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील ४, यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील ३५, बेचखेड व खैरगाव येथील प्रत्येकी २, वडगाव येथील ६० असे एकूण पुरात अडकलेल्या २८० नागरिकांचे बचाव पथकाने सुरक्षित स्थलांतरण केले. पूरपरिस्थितीमुळे घर पडून यवतमाळ तालुक्यातील वाघाडी येथील एक महिला व बाभूळगाव तालुक्यातील सावरगांव येथील एक व्यक्ती पुरात वाहुन गेल्याने मृत झाल्याची घटना घडली आहे.

पूरपरिस्थितीमुळे काही लोकांचे तात्पुरत्या निवारागृहात स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील ३ हजार ५०० नागरिक, बाभुळगाव तालुका ४००, आर्णी १४०, राळेगाव ७, घाटंजी ५००, दिग्रस ४००, दारव्हा २५०, नेर १०० व कळंब तालुक्यातील २० नागरिक असे एकूण ५ हजार ३१७ नागरिकांची निवारगृहात व्यवस्था करण्यात आली. याठिकाणी भोजणासह अन्य आवश्यक व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. निवारागृहासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेला सतर्क पाहण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायंकाळी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आँनलाईन बैठक घेतली. यावेळी त्यांनी परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. नुकसानग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान व धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले. सततधार सुरु राहिल्यास पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे, अशा सूचना केल्या. पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणावरुन नागरिकांना हलविण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.