कपिल शर्मा शोमधील अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण सांगताना म्हणाला, “लिव्ह-इन पार्टनरबरोबर…”

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणारा अभिनेता तीर्थानंद राव याने फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. लाइव्ह संवादादरम्यान तीर्थानंदने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला असे करताना पाहून त्याच्या ऑनलाइन मित्रांनी जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला आणि पोलीस लगेच तीर्थानंदच्या घरी पोहोचले; जिथे तो बेशुद्धावस्थेत सापडला.

तीर्थानंदला ज्यूनिअर नाना पाटेकर म्हणूनही ओळखले जाते. तीर्थानंदने सांगितले की, तो एका महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, जिला दोन मुलीही आहेत. याच महिलेमुळे त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. त्याने काही दिवसांपूर्वी या महिलेला भेटल्याचे सांगितले. नंतर ती तीर्थानंदला पैशासाठी धमकावू लागली आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. तीर्थानंद म्हणाला की, त्याला काही झाले तर न्याय मिळाला पाहिजे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना तीर्थानंदने सांगितले की, या महिलेमुळे माझ्यावर तीन ते चार लाख रुपयांचे कर्ज आहे. मी या महिलेला ऑक्टोबरपासून ओळखतो. तिने माझ्याविरुद्ध ब्रांदा येथे तक्रारही केली आहे. माझ्यावर कोणत्या कारणास्तव आरोप केले गेले आहेत हे मला माहीत नाही. पण ती मला फोन करून भेटायला सांगते. तीर्थानंदने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्या महिलेमुळे तो घरातून पळून जात होता. या महिलेने त्याला फूटपाथवर झोपण्यास भाग पाडले.

यामुळेच तीर्थानंदने आत्महत्येचा प्रयत्न केला. जर त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर त्याला फक्त आणि फक्त ती महिलाच जबाबदार असेल असेही तीर्थानंदने सांगितले. वृत्तांनुसार, जेव्हा पोलिस तीर्थानंदच्या घरी पोहोचले तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. घाईघाईत पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो त्याच्या घरी आहे.