पुणे शहरातील गुन्हेगारांवर कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही वचक राहिलेला नाही – मुळीक 

पुणे – मागील काही काळापासून पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. गुन्हेगार निर्ढावत चालले आहेत. कायद्याचा काहीही वचक राहिलेला नाही. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली अशी प्रखर टीका पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

महिलांवर आणि शाळकरी मुलींवर अत्याचाराचे रोज नवीन गुन्हे घडत आहेत. काही गुन्ह्यांमध्ये तर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी आहेत. पोलिस त्यांना वाचवायचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे इतर गुन्हेगारांना देखील बळ मिळत आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत देखील लुटमारीचे प्रकार शहरात खूप वाढलेले आहेत. तसेच आर्थिक फसवणुकीचे प्रकार रोज उघडकीस येत आहेत. महाराष्ट्र सरकार याबाबतीत कोणतीही ठोस कार्यवाही करण्याच्या परिस्थितीत नाही. फक्त भ्रष्टाचार आणि वसुली खोरी यामध्येच सरकार सध्या व्यस्त आहे.

गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही वचक राहिलेला नाही. पुणे शहरातील नागरिकांना दाद कोणाकडे मागायची आणि दाद मागितली तर न्याय मिळेल का हा प्रश्न भेडसावत आहे. पुणे शहराला खरंच कोणी वाली आहे का असा प्रश्न जगदीश मुळीक यांनी विचारला आहे. नागरिकांची सुरक्षा हे प्रशासनाचे प्राथमिक काम आहे परंतु भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या सरकारला याचा पूर्ण विसर पडला आहे अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली.