मराठी साहित्य जगताला अण्णाभाऊंच्या साहित्याचा आवाका समजला नाही -पानिपतकार विश्वास पाटील 

Vishwas Patil:- अण्णाभाऊंचे साहित्य हे अनुभवातून आलेले साहित्य होते. महाराष्ट्राच्या रानवाटा तुडवत त्यांच्या गाठीशी जो अनुभवसंचय झाला, जी विषमता त्यांनी समाजासमाजात पाहिली त्या वेदनेतून अण्णाभाऊ साठे यांचे अस्सल साहित्य जन्माला आले. परंतु, महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात आणि साहित्य वर्तुळात ते दुर्लक्षित राहिले. मराठी साहित्य जगताला अण्णाभाऊंच्या साहित्याचा आवाका समजला नाही,अशी खंत ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे आज आयोजित पहिल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून विश्वास पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक सुनील वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या निबंधक इंदिरा अस्वार, साहित्यिक मिलिंद कसबे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. दिनेश डोके, पद्मश्री गिरीश प्रभुणे, मच्छिंद्र सट्टे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे विभागप्रमुख सत्येंद्रनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या संमेलन स्थळाचे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरी असे करण्यात आले होते. यानिमित्त ग्रंथमहोत्सव आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, ”माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली” हे शब्द कोण्या प्रेयसीला उद्देशून लिहिलेले नसून मुंबईत सांडलेल्या १०६ हुतात्मांच्या रक्ताच्या वेदनेतून स्फुरलेले हे काव्य आहे. अण्णाभाऊंनी महिलांच्या आयुष्याच्या गाभ्याला हात घालणारे विपूल साहित्य लिहिले. एवढे विपूल, विस्तृत आणि काळजाला हात घालणारे लेखन करूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार किंवा चर्चा देखील केली गेली नाही. पं.जवाहरलाल नेहरू आणि मोरारजी देसाई यांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याच्या कुटील कारस्थानाला अण्णाभाऊंनी त्यांच्या लोकगीतांच्या माध्यमातून सुरूंग लावला. अण्णाभाऊ साठे हे मातीतले साहित्यिक होते आणि ‘फकिरा’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. विदर्भ-मराठवाड्यात अण्णाभाऊंचा जेवढा उत्सव साजरा केला जातो, तेवढा उत्सव पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रात झाला नाही, हे खेदजनक आहे.

यावेळी बोलताना  पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की, ज्या वंचित, दुर्लक्षित परंतु वैभवसंपन्न संस्कृती लाभलेल्या समाजातील मोठ्या वर्गाला नाही रे या वर्गवारीत मोडून आयुष्यभर दुर्लक्षित ठेवले, त्यांना मतदानाचा देखील अधिकार नव्हता असे सर्व आज शिक्षणाव्दारे प्रगती करून समाजातील विविध क्षेत्रात पुढे येत आहेत. तसेच ते निवडूनही येत आहेत. शाहू-फुले-आंबेडकर, लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे या महान लोकांनी गेल्या शतकात जो पाया रचला त्यावर यशाची ही शिखरे उभी रहात आहेत.

यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. दिनेश डोके आणि अंकल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक सुनील वारे यांनी संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन सविता इंगळे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात