वळसे पाटलांची उचलबांगडी झाल्यास गृहमंत्रीपदासाठी ‘या’ दोन नेत्यांची नावे चर्चेत 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या सिल्व्हर ओक  या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी गृह विभागावर टीका केली असून विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्यातील गृह विभाग (Home Minister ) नेमका करतोय काय असा सवाल उपस्थित होत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची हकालपट्टी होऊ शकते असं सांगितले जात आहे.  हे खाते जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad )  किंवा राजेश टोपे (Rajesh Tope)  यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.गृह खात्याचा कारभार अधिक आक्रमक मंत्र्याकडे द्यायला हवा, अशी मागणी सोशल मीडियावरून राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांध्येही याबाबत जोरदार चर्चा आहे.