मुख्यमंत्र्यांचे कुटुंब ही १२ कोटी जनता असते हे विद्यमान मुख्यमंत्री विसरले असावेत’

पुणे – ईडीनं मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडल्यावर आता भाजप नेते योगेश टिळेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, मला कुणावरही व्यक्तिगत टीका करायला आवडत नाही आणि मी करत सुध्दा नाही. पण आजच चित्र बघून राहवलं नाही म्हणून लिहितोय.. मेहुण्यावर शासकीय कारवाही झाली म्हणून मुख्यमंत्री लगबगीने घराबाहेर पडले, स्वतः गाडी चालवत निघाले. पण राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे माझे एस टी कर्मचारी रोज आत्महत्या करत आहेत तेव्हा मुख्यमंत्री काय करत होते?

काल परवा एका एस टी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली, तेव्हा सुध्दा यांचं हृदय द्रवल नाही, एस टी कर्मचारी म्हणजे माणसं नाहीत का? त्यांना कुटुंब नाही का? मुख्यमंत्र्यांचे कुटुंब ही १२ कोटी जनता असते हे विद्यमान मुख्यमंत्री विसरले असावेत…. असं टिळेकर यांनी म्हटले आहे.