राणा दाम्पत्य लवकरच घरी येणार याची खात्री आहे; रवी राणांच्या मोठ्या बंधूंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसेचं (Hanumaan chalisa)  पठन करण्याची भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या नवनीत आणि रवी राणा ( Navneet -Ravi Rana)  या खासदार-आमदार दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. राणा दाम्पत्यावर सामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याचा, पोलिसांच्या कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल असून आता जमीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांचे मोठे भाऊ सुनील राणा ( Sunil Rana elder brother of MLA Ravi Rana ) यांनी कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन करत आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्‍वास असून  4 मे रोजी निश्चितच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. आता माझ्या आई-वडिलांसह घरातील मुलांनाही आमच्या घरातील हे दोन महत्त्वाचे सदस्य लवकरच घरी येतील, याची प्रतीक्षा असून कार्यकर्त्यांनी आज जामिन संदर्भात न्यायालयाचा निर्णय आला नसल्यामुळे खचून जाऊ नये असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नवनीत राणा, रवी राणांच्या अडचणी आता पुन्हा वाढल्या आहेत. खार येथील त्यांच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आता राणा दाम्पत्याला महापालिकेने नोटीस बजावली आहे. हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्य कारागृहात असताना आता महापालिकेने त्यांना नोटीस बाजावली आहे. खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम झाले आहे, का याची पाहणी महापालिकेचे अधिकारी करणार आहेत.