संकटात असलेल्या हिमालयाला सह्याद्री वाचविण्यासाठी जाणार – नाना पटोले

मुंबई/शिर्डी –   अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबारातील ठराव व प्रस्ताव यांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक विषयावर आधारीत सहा गट विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायचे यासंदर्भात एक ठोस धोरण ठरवले व त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाईल. असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले.  या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील  एच. के. पाटील   काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले,  ‘एक व्यक्ती, एक पद’ या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. याबरोबरच राजकीय पातळीवरील आव्हानांचा सामनाही आपल्याला करावयाचा आहे. हा देश काँग्रेसच्या त्यागाने, बलिदानाने उभा राहिलेला आहे परंतु आज देशच संकटात सापडलेला आहे. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट येते तेव्हा तेव्हा सह्याद्री  मदतीला धावतो हा इतिहास असून आज देशाला महाराष्ट्राची गरज आहे. आज पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाईल, असे नाना पटोले म्हणाले.