जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचा अंतर्गत वाद तात्काळ मिटवून रुग्णांचे सुरु असलेले हाल तात्काळ थांबवावेत 

राज्याच्या आरोग्यसेवेची अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टरांची गरज ओळखून जे जे तील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादावर सर्वमान्य तोडगा काढावा...

मुंबई  – मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामुहिक राजीनामा, रुग्णालयातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप, जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर, राज्याच्या आरोग्यसेवेवर होत असलेला दुष्परिणाम, यासंदर्भात राज्याचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना पत्र लिहिले असून मुंबईतील जे जे रुग्णालयात सुरु असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णसेवा ठप्प पडली असून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरु असल्याकडे लक्ष वेधले आहे.

मुंबईतील जे जे रुग्णालयातल्या नेत्रोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख, जे जे रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना, डॉ. हेमालिनी मेहता (Head of Ophthalmology Department Dr. Ragini Parekh, former founder of JJ Hospital, Padma Shri Dr. Tatya Rao Lahane, Dr. Shashi Kapoor, Dr. Deepak Bhat, Dr. Sally Lachne, Dr. Pritam Samant, Dr. Swaranjit Singh Bhatti, Dr. Ashwin Bafna, Dr. Hemalini Mehta)या नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या सेवेचा अचानक सामुहिक राजीनामा दिला आहे. नेत्रविभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सामुहिक राजीनामा दिल्याने, जे जेच्या नेत्रविभागाचे रुग्णांना तपासण्याचे आणि निवासी डॉक्टरांना शिकवण्याचे काम ठप्प पडले आहे. या नऊ वरिष्ठ डॉक्टरांच्या राजीनाम्याच्या बरोबरीने, जे जे रुग्णालयातील मार्डचे ७५० निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचाही जे जेतल्या सर्व विभागांच्या रुग्णसेवेवर परिणाम विपरीत झाला आहे. ओपीडीत येणाऱ्या आणि अ‍ॅडमिट झालेल्या रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरु आहेत. हे हाल तात्काळ थांबविण्याची गरज आहे.

जे जे हॉस्पिटलमधली ही परिस्थिती, मार्डचे निवासी डॉक्टर विरुद्ध डॉ. तात्याराव लहाने, डॉ. तात्याराव लहाने विरुद्ध अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अंतर्गत वाद, संघर्षातून निर्माण झाली आहे. याचा फटका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि अ‍ॅडमिट झालेल्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. जी माहिती समोर येतेय, त्यातून असे समजते की, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी, डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडून सुरु असलेल्या छळाला, असहकार्याला कंटाळून राजीनामा दिला आहे. जे जे हॉस्पिटलसारख्या प्रतिष्ठित, लोकोपयोगी आरोग्य संस्थेच्या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये असा वाद असणे योग्य नाही. हा वाद राज्याच्या आरोग्यसेवेसाठी मारक असल्याने तात्काळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी या वादावर तातडीने, सर्वमान्य, कुणावरही अन्याय होणार नाही, राज्याच्या आरोग्यसेवेच्या हिताचा असेल, असा व्यावहारिक तोडगा काढायला हवा, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली आहे.

जे जे रुग्णालयासारख्या प्रतिष्ठित रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांमधले अशा प्रकारचे वाद चिघळू न देता तात्काळ मिटवले पाहिजेत. यावर समाधानकारक तोडगा काढून रुग्णांचे हाल थांबवले पाहिजेत जे जे हॉस्पिटलसारख्या संस्थेत शिस्त पाळली गेली पाहिजे, हे सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे. डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्तीनंतरही सेवा देत आहेत. त्यांच्यासारख्या अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टरांची गरज, आरोग्यसेवेला नेहमीच असणार आहे. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह सर्वच वरिष्ठ डॉक्टरांना त्यांचे राजीनामे मागे घेण्यास सांगावे. मार्डच्या निवासी डॉक्टरांचेही समाधान होईल, असा सर्वमान्य, रुग्णांच्या, राज्याच्या हिताचा तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पत्रात केली आहे.