तत्कालीन मुख्यमंत्री-गृहमंत्री यांची चौकशी झालीच पाहिजे; फोन टॅपिंग प्रकरणी मिटकरी यांची मागणी

मुंबई – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा टेलिग्राफ कायद्यांतर्गत नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शुक्ला यांनी पदाचा गैरवापर करून १ नोव्हेंबर २०१९ मध्ये खासदार संजय राऊत यांचे फोन टॉप केले. तर भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोन टॅपींग केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे काल मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश देण्यात आले आहेत. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, आता याच मुद्यांवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरसंधान केले आहे. ते म्हणाले, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी खा. संजय राऊत आणि एकनाथराव खडसे साहेब यांचे फोन टॅप केले हे महाराष्ट्राच्या समोर आले आहे. अशा अधिकाऱ्यांना दोनच व्यक्ती आदेश देऊ शकतात एक मुख्यमंत्री दुसरे गृहमंत्री. ही खाती ज्यांच्याकडे होती त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.