ज्यूलियन असांजचं ब्रिटनमधून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याबाबतचा खटला अमेरिकेनं जिंकला

लंडन – विकिलीक्सचा संस्थापक ज्यूलियन असांजचं ब्रिटनमधून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याबाबतचा खटला अमेरिकेच्या सरकारनं काल जिंकला. लंडन उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा प्रत्यार्पणाची परवानगी न देणारा निर्णय रद्दबातल ठरवला. आता याबाबतची विनंती गृह सचिवांना पाठवली जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल.

या निर्णयाच्या विरोधात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती असांजच्या वकिलांनी दिली आहे. 50 वर्षीय असांजवर अमेरिकेची गुप्त कागदपत्र प्रसिद्ध केल्याबद्दल गोपनीयतेच्या कायद्यांतर्गत अमेरिकेत गुन्हा दाखल आहे.

2010-11 साली हजारो गुप्त दस्तावेज प्रसिद्ध केल्याबद्दल 49 वर्षीय असांज यांचा तपास सुरू आहे. दस्तावेज प्रसिद्ध करून असांज यांनी आपले कायदे मोडले आहेत असा अमेरिकेचा दावा आहे तसंच त्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे.

या प्रत्यार्पण मागणीला विरोध करत हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं असांज सांगत आहेत. दरम्यान, इराक आणि अफगाणिस्तान युद्धाशी संबंधित गुप्त दस्तावेज उघड केल्याचा आरोप असांज यांच्यावर आहे. त्यातून अमेरिकन सैनिकांनी तेथे शोषण केल्याचं स्पष्ट होतं असं असांज सांगतात.