ऐनवेळी अक्षदा पडण्यापूर्वी थांबविण्यात आला विवाह सोहळा, कारण ….

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथे दोन अल्पवयीन मुलीचा बाल विवाह दि.24 डिसेंबर 2021 रोजी ऐनवेळी लावून दिला जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला मिळाली असता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन यांच्या हस्तक्षेपामुळे सदरील बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

सध्याच्या लगिन सराईला वेग आला असता सेनगाव तालुक्यातील मौजे साखरा गावात बाल विवाहाचे नियोजन झाले होते. बाल विवाह होत असल्याची चाहुल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट, क्षेत्र बाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत तर चाईल्ड लाईनचे विकास लोनकर, टिम मेंबर तसेच सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे, सहा.पोलीस निरीक्षक मोपडे तसेच त्यांची टिम यांनी घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची चौकशी केली असता बालिकेचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते.

संबंधित गावातील ग्रामसेवक आर.एस. गोरडे, सरपंच अशोक मणिकराव इंगळे, पोलीस पाटील संगीता शरद चवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडी ताई व मुलीचे आई-वडील व मामा यांची भेट घेतली. बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यास 1 लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बाल विवाहाच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यात आले व ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष मुलीच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला व या बालिकेला बाल कल्याण समिती हिंगोली यांच्या समोर सादर करण्यात आले, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी , हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.