मंगळवेढा उपविभागातील अवैध धंद्यासंदर्भात पोलीस आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करणार – देसाई

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उप विभागातील बेकायदेशीर अवैध धंद्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य समाधान अवताडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली. त्यास उत्तर देताना देसाई बोलत होते.

गृहराज्यमंत्री   देसाई म्हणाले, मंगळवेढा व सांगोला या पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात 147 केसेस, दारूबंदीबाबत 392 केसेस, अवैध जुगारासंदर्भात 99 केसेस, अंमली पदार्थांसंदर्भात 5 तर गुटखा संदर्भात 14 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या तालुक्यात अवैध धंद्यांसंदर्भात तक्रारी येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहेत. गुन्हे नोंदविण्यात आले असून, पोलीस कारवाई करत आहेत. मंगळवेढा भागातील वाळू चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात आहे.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मंगळवेढा उप विभागातील बेकायदेशीर अवैध धंद्यांसंदर्भात आलेल्या तक्रारींवर पोलीस आयुक्तांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीअंती दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच एखाद्या प्रदेशात एकाच गुन्ह्यासाठी दोनपेक्षा जास्त वेळा एकाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असेल, तर त्याला तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

सोलापूर येथे अवैध धंद्यासंदर्भात घडलेल्या घटनेबाबत पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क या दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने हातभट्टी दारूविरोधात अभियान राबविण्यात आले असल्याचेही देसाई यांनी उत्तरात सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.