वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहन मालकांना वाहनाची पुनर्नोंदणी करुन घ्यावी लागणार

हिंगोली : परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल, खाजगी मोटार कार इत्यादी वाहनाची वैधता नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे झालेली आहे व ज्या वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपली असेल त्यांनी आपली वाहने पुनर्नोंदणी करुन घेण्यात यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

यामध्ये मोटार सायकलच्या एमएच38ए… , एमएच38एच… आणि मोटार कार यांच्या एमएच38… या नोंदणी क्रमांक सिरीजचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी आपल्या वाहनाचा नोंदणी दिनांक तपासून वाहनाची पुनर्नोंदणी करुन घ्यावी.

वाहनाची पुनर्नोंदणी करण्यासाठी शासनाकडून केंद्रीय मोटार (23 वी सुधारणा) नियम 2021 नुसार वाहन 15 वर्षे जुन्या परिवहनेत्तर वाहनाची पुनर्नोंदणी फिसमध्ये आठ पट वाढ होणार आहे. तसेच वाहन पुनर्नोंदणीसाठी उशीर झाल्यास विलंब शुल्क देखील आकारला जाणार आहे. हा नियम 01 एप्रिल, 2022 पासून लागू होणार आहे. तसेच ज्या परिवहन वाहनाची योग्यता प्रमाणपत्राची वैधता समाप्त झालेली आहे किंवा ज्या परिवहन वाहनाचा मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकीत आहे त्यांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व वाहनावरील थकीत कराचा तातडीने भरणा करावा.

हिंगोली येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन नोंदणीची वैधता संपलेल्या वाहन, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या आणि थकीत मोटार वाहन, पर्यावरण कर प्रलंबित असलेल्या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहनाची पुनर्नोंदणी करुन घ्यावी. वाहन मालकांना काही अडचण असल्यास त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.