‘… तर मग आमदार-खासदारांच्या मुलांना अग्निपथ योजनेत नोकरी बंधनकारक करा’

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत(agnipath) देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे.

सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आंदोलक तरुण करत आहेत. ही योजना रद्द करण्याची मागणी युवा आंदोलक करत आहेत.विरोधी पक्षांतील नेत्यांकडून या योजनेला विरोध केला जात आहे. काँग्रेसनंतर आता आम आदमी पक्षानेही या योजनेला विरोध केला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करुन यासंदर्भातील भूमिका मांडली आहे. अग्निपथ योजना किती चांगली आहे, तरुणांच्या भविष्याला उज्ज्वल करणारी आहे, असे भाजप नेते सांगत आहेत. त्यावरुनच, सिसोदिया यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जर अग्निपथ योजना खरंच एवढी चांगली असेल तर एक नियम बनवाच. देशातील प्रत्येक आमदार आणि खासदाराची मुले वयाची 17 वर्षे पूर्ण केल्यास सर्वप्रथम अग्निपथ योजनेचा लाभ घेतील, 4 वर्षे नोकरी करतील , अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे.