अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्याला फटका; पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

सोलापूर – सोलापूर (Solapur) जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे 119 हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला असल्याचं प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले आहेत.

माळशिरस, मोहोळ, बार्शी, करमाळा, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अहमदनगर जिल्ह्यातही झालेल्या नुकसानाची पाहणी विखे-पाटील यांनी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी (Farmer) मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. काढणीला आलेले द्राक्षांचे घड गारपिटीनं फुटले आहेत, बाजारात त्‍यांची विक्री होणार नाही, अनेक द्राक्ष उत्पादकांनी व्यापाऱ्यांना बोलावून आपले व्यवहार ठरविले होते. परंतु नैसर्गिक आपत्ती ने मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागलेल्‍या शेतक-यांनी आपलं गाऱ्हाणं मंत्र्यांसमोर मांडलं.

राज्यातील 10 हजार एकरावरील द्राक्षबागांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून हंगाम अखेरच्या टप्प्यात असताना दर आणि मागणी घटली आहे. अनेक ठिकाणी द्राक्षे काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे बेदाणा निर्मितीलादेखील फटका बसला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली आहे. राज्यात सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, उस्मानाबाद जिल्ह्यांत एकंदर साडेतीन लाख एकर द्राक्ष पिकाचं क्षेत्र आहे. सोलापूर परिसरात सर्वाधिक सहा हजार एकर, तर पुणे, सांगली, उस्मानाबाद आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी हजार एकरवर द्राक्षांची लागवड केलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज दुपारी धाराशिव (Dharashiv) तालुक्यातील धारूर तसंच वाडी बामणी या गावांना भेटी देऊन शेत पिकांच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.