सत्ता असो किंवा नसो येवला मतदासंघांच्या विकासात खंड पडणार नाही –  छगन भुजबळ

येवला – सत्ता ही जात येत असते त्यामुळे सत्ता असो किंवा नसो येवला मतदासंघांच्या विकासात खंड पडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले(Chhagan Bhujbal) . त्यांच्या हस्ते  येवला मतदारसंघांतील निफाड मधील सारोळे खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे, हरिश्चंद्र भवर,डी. के. जगताप,शिवा पाटील सुरासे, बाबाजी जेऊघाले, माधवराव ढोमसे, सुरेश खोडे,संदीप भोसले,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,शिवाजी सुपनर,अनुप वनसे,विष्णू वन्से, म्हसू भोसले,कैलास भोसले,सतीश भोसले,नवनाथ जेऊघाले, अश्विन भोसले, रावसाहेब जेऊघाले, विष्णू डुकरे, गोविंद जेऊघाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, सद्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अतिशय गुंतागुंतीच्या असून त्याचा संपूर्ण निकाल हा न्यायालयाच्या हातात आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्यावर सरकारचे भवितव्य ठरेल त्याची चिंता करण्याचे कुठलेही काम नाही.आपली विकासाची कामे ही निरंतर सुरू राहतील येवला मतदासंघांच्या विकासात कुठलाही खंड पडणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, देशातील प्रत्येक लहान लहान घटकाला स्वातंत्र्याचा फायदा मिळाला पाहिजे घटनेने त्यांना दिलेले हक्क त्यांना मिळाले पाहिजे. तरच आपण सर्वसमावेशक विकास साधू शकतो. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये जे जे लोक रस्त्यावर उतरले लढा दिला त्या सर्वांचे यामध्ये श्रेय आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचा प्रश्न जरी आज सुटला असेल तरी संपूर्ण देशाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात ओबीसींना संविधानिक आरक्षण मिळवून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले की, संपूर्ण राज्याच्या जिल्हा नियोजनाचा निधी सरकारने थांबविला आहे. हा निधी सरकारने लवकरात लवकर द्यावा त्यामुळे जनहिताची अनेक कामे रखडली आहे. हा निधी कुण्या एकट्या साठी नाही तर सर्व जिल्ह्यांच्या व राज्यातील सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.