‘ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली आहे त्यांच्यावर ते काहीही कारवाई करणार नाहीत, कारण….’

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. या निकालामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून शिवसेनेवर विरोधकांचे शरसंधान सुरु आहे. यातच आता  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली आहे त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते, असा गर्भित इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तुम्ही कोणामुळे जिंकले आहात हे आम्हाला माहिती आहे, असा दावा मविआतील काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यांनी खरंच ही गोष्ट माहिती असेल तरी ते आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचे सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे मविआ आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करायला गेली तर ते आमदार पक्षाची साथ सोडतीलच. पण त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असूनही मनाने आपल्यासोबत असलेल्या व दबावामुळे आपल्याला मदत न करू शकणारे आमदारही सरकारमधून निघून जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.