‘लोकसंवादाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांची तुलना सध्या महाराष्ट्रातील कुणाशीच होऊ शकत नाही’ 

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. या निकालामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून शिवसेनेवर विरोधकांचे शरसंधान सुरु आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, नागरिकांशी बोलणे, लोकांचे फोन घेणे, त्यांना पुन्हा फोन करणे या लोकसंवादाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांची तुलना सध्या महाराष्ट्रातील कुणाशीच होऊ शकत नाही. लॉक डाऊन च्या काळात मी याबाबत एक विस्तृत पोस्ट लिहिली होती की कोण कोणते नेते मोबाईल हे संवादाचे उत्तम माध्यम म्हणून वापरतात.

उद्धव ठाकरे अनेक आमदारांना सुद्धा भेटत नाहीत, फोनवर बोलत नाही ही आमदारांची तक्रार अनेक वर्षांपासूनची आहे. राजकारणात राहून अशी वागणूक आधुनिक काळात चालत नाही याची माहिती ते आदित्य ठाकरेंना सुद्धा देत नाहीत. असंवादातून विसंवाद होतो याची जाणीव त्यांना आता राज्यसभेच्या ताज्या निवडणुकीनंतर झाली असेल तर त्यांच्या पक्षासाठी चांगले आहे. बरं हे बोलत नाहीतच पण यांचे पीए सुद्धा तसेच हेकट व संवादशून्य आहेत. आदित्य ठाकरे यांचे पीए त्याचपैकी एक. काही पक्षांच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे पीए मात्र असा संवाद साधतात की त्या मंत्र्यांवरील राग सुद्धा निघून जावा. असो लोकांशी संवाद म्हणजेच लोकशाहीची एक पायरी असते हे कुणाला माहिती नाही असे नाही.असं सरोदे यांनी म्हटले आहे.