लखनऊने चिटिंग करुन सामना जिंकला, मुंबईविरुद्ध ११ नव्हे १२ खेळाडू मैदानावर उतरवले?

LSG vs MI : लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) संघात झालेला आयपीएल २०२३ मधील ६३ वा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ३ बाद १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला ५ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावाच करता आल्या आणि लखनऊने ५ धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह लखनऊचा प्लेऑफचा मार्ग सोपा झाला आहे. तर मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकावा लागेल. तसेच इतर संघांच्या कामगिरीवरही त्यांचे नशीब अवलंबून असेल.

या सामन्याच्या निकालानंतर मुंबई विरुद्धच्या सामन्यात लखनऊकडून ११ नाही, तर १२ खेळाडू खेळत असल्याचे म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे तो खेळाडू सर्वांसमोर खेळत होता. त्यानंतही अंपायर्सने रोखलं नाही. तो १२वा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) होता. गंभीर डगआऊटमधून सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजांना इशाऱ्याने मार्गदर्शन करत होता. तसेच अधेमधे पाणी द्यायला जाणाऱ्या खेळाडूंद्वारे ही मेसेज मैदानात पोहचवत होता. विजय दहीया हा देखील असंच काही करत होता.

प्रत्येक सामन्यात टीममधील मेन्टॉर असंच काही खाणाखुणा करत असतात. हे असं चूक बरोबर, नंतरचा मुद्दा. पण मुंबईचा पराभव हा चाहत्यांच्या जिव्हारी लागलाय. त्यात सूर्यकुमार यादव हा देखील ७ धावांवर आऊट झाल्याने मुंबईच्या चाहत्यांचा तीळपापड झालाय. त्यामुळे लखनऊकडून ११ नाही, तर १२ खेळाडू खेळत असल्याचं म्हटलं जात आहे.