सोन्याचे दागिने विकत घेता, पण त्यांची किंमत कशी ठरवली जाते माहितीय का? असं आहे गणित

Gold Price: सोने हे जगातील सर्वात मौल्यवान आणि लोकप्रिय धातूंपैकी एक आहे. प्राचीन काळापासून सोने हे चलन म्हणून वापरले जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सोन्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपल्या देशात बहुतेक महिला सोन्याची बचत करतात. येथे सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्हीही कोणत्यातरी शुभ प्रसंगी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केले असतील.

सोन्याची शुद्धता मोजण्यासाठीच्या युनिटला कॅरेट म्हणतात. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. यानंतर 22, 18 कॅरेट सोने येते. तुम्ही कधी विचार केला आहे का की, सोने वेगवेगळ्या कॅरेटचे असते आणि मग तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत (Gold Jewellery Price) कशी ठरवली जाते?

24 कॅरेट सोने शुद्ध मानले जाते आणि ते खूप मऊ असते, त्यामुळे या सोन्यापासून दागिने बनवले जात नाहीत. सोने मजबूत करण्यासाठी त्यात तांबे, कांस्य आणि चांदी यांसारखे धातू जोडले जातात. अशा परिस्थितीत सोन्याचे भाव कसे ठरतात? ते जाणून घेऊया…

किंमत कॅरेटनुसार ठरवली जाते
खरेदीच्या दिवशी सोन्याची किंमत 56,000 रुपये असेल, तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 56,000/24×18 रुपये म्हणजेच 42,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असावी. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यावर ज्वेलर्स मेकिंग चार्ज स्वतंत्रपणे वसूल करू शकतात.

जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याची शुद्धता (22/24)×100 = 91.66% असेल. जर सोन्याचा दर 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल, तर 22 कॅरेट सोन्याचा दर (56,000/24) × 22 म्हणजेच 51,333 रुपये असावा. त्याचप्रमाणे, 20 कॅरेट सोन्याची किंमत (56,000/24) × 20 म्हणजेच 46,666 रुपये प्रति 10 ग्रॅम असावी. नियमानुसार सोनाराने तुमच्याकडून पैसे घेतले पाहिजेत.