दसरा मेळावाही घरी बसून ऑनलाइन पद्धतीने घ्या,ते तुम्हाला जास्त शोभून दिसेल; शीतल म्हात्रे यांचा ठाकरेंना टोला

मुंबई- दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. दसरा मेळाव्याकरता बीकेसीतील एक मैदान शिंदे गटानं आरक्षित केलं आहे.

ठाकरे गटाला अद्याप दसरा मेळाव्यासाठी कोणतही मैदान मिळालेलं नाही, त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. याचदरम्यान शिंदे गटातील शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre)  यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला आहे.

दरवर्षीपेक्षा यावर्षीचा दसरा मेळावा अधिक वाजता गाजत होणार असल्याचं शीतल म्हात्रे म्हणाल्या. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असल्याने अधिक खास असल्याचं शीतल म्हात्रे म्हणाल्या. यावेळी, शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटालाही लक्ष्य केलं आहे. शिंदे-फडणवीस खंबीर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. धमक्या देऊ नका, असंही म्हात्रे म्हणाल्या. तुम्ही दसरा मेळावा घरी ऑनलाईन पद्धतीने करावा हेच योग्य, असा टोलाही शीतल म्हात्रेंनी लगावला.