‘लहान बहीण जेव्हा कर्तबगारीने आपल्या नावाचा ठसा राज्यभर उमटवत असते, तेव्हा…’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि एकमेव महिला मंत्री आदिती तटकरे यांचा आज जन्मदिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तटकरे यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लहान बहीण जेव्हा आपल्या कर्तबगारीने आपल्या नावाचा ठसा राज्यभर उमटवत असते, तेव्हा आई-वडिलांबरोबरच भावाची देखील छाती फुगून येते. माझी कर्तव्यनिष्ठ लहान बहीण आदिती तटकरे ताईस जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद. तुला उत्तम आयुरारोग्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना’. असं ट्विट करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. वयाच्या 31व्या वर्षीच त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या खात्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

आदिती यांनी एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीपासूनच आदिती राजकारणात सक्रिय आहेत. 2008-2009मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता. 2011-2012मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस ज्वॉईन केली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. 23 फेब्रवारी 2017 रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. 2019मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या.