शेतात पाणी देताना फावड्याचा दांडा काढून माईक बनवणारा आज बनतोय पंजाबचा मुख्यमंत्री !

पंजाब : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. भगवंत सिंग मान हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भगवंत सिंग मान एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 ला पंजाबच्या संगरूर जिल्ह्याच्या शिमा मंडीच्या जवळ असलेल्या सतोज या गावी झाला होता. त्यांचे वडील महिंदर सिंग सरकारी शिक्षक होते आणि आणि आई हरपालकौर गृहिणी आहे. भगवंत मान यांना लहनापणापासूनच भाषण देण्याची सवय होती. त्यावेळी कॉमेडीयन बनतील की नेते बनतील हेही त्यांना माहिती नव्हतं. भगवंत मान शेतात पाणी देताना किंवा लाकूड कापताना दांडा हातात घ्यायचे आणि त्याचाच माईक तयार करून भाषण करत असायचे.

पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर भगवंत मान कॉमेडीच्या क्षेत्रात आले. संगरुरच्या सुनाम शहीद उधम सिंह कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्यांनी कॉमेडी आणि कवितेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. तसंच ते व्यावसायिक कॉमेडियनही बनले.

मी कॉमेडीच्या माध्यमातून एकप्रकारे राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडतच असतो. आता मला वाटतं की, चिखल स्वच्छ करायचा असेल तर त्यात उतरावंच लागणार आहे. त्यामुळं मी सक्रिय राजकारणात आलो आहे, असं भगवंत मान यांनी राजकारणात पाऊल ठेवताना म्हटलं होतं.