टीम इंडियाला मिळाला ‘अनमोल रत्न’! बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध शुबमन गिलचे शानदार दीडशतक

आज हैदराबाद येथे भारतीय संघाचा सामना जगातील नंबर १ संघ न्यूझीलंडशी (IND vs NZ) झाला. उभय संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला वनडे सामना (First ODI) खेळला गेला. हा सामना भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने गाजवला. गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढत शानदार दीडशतक ठोकले. या शतकासह त्याने मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

गिलने ८७ चेंडूत २ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने शतक (Shubman Gill Century) पूर्ण केले. हे शुबमनचे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक होते. तसेच या खेळीसह शुबमनने त्याचे वनडेतील १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. केवळ १९ डावात हा पराक्रम करत सर्वात जलद वनडेतील हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

तर भारताकडून हा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याने पाकिस्तानचा बाबर आझमला या विक्रमात मागे सोडले आहे. आझमने २१ डावात वनडेतील १००० धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच हे गिलचे सलग दुसरे व एकूण तिसरे वनडे शतक आहे. गिलने पुढे संयमाने फलंदाजी करत आपल्या शतकी खेळीला दीडशतकात रुपांतरित केले.